छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कार्यकारिणी बैठकीत निवड; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा
कणकवली (प्रतिनिधी) : ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषद, नांदापुरकर सभागृहात कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या बैठकीत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी समाजभूषण संदीप लहु कदम यांची निवड करण्यात आली.
या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, शैक्षणिक मार्गदर्शन तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आगामी काळातील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजभूषण संदीप कदम यांचा कार्यकारिणीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विविध पदांवर नियुक्त झालेले नवनियुक्त पदाधिकारी, नवनियुक्त केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
समाजभूषण संदीप लहु कदम हे महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले पदाधिकारी असून, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि विविध सामाजिक चळवळींमध्ये ते अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या संघटनात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या चळवळीत तसेच धम्म चळवळीत त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. सामाजिक न्याय, शैक्षणिक हक्क, मागासवर्गीय कर्मचारी व शिक्षकांचे प्रश्न आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि कर्मचारी क्षेत्रात त्यांची एक सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
संदीप कदम हे सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, दी बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष तसेच जनकल्याण मैत्री संघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदाची नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांना संघटनात्मक पातळीवर अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे महासचिव सुरेश तांबे, बि. डी. धुरंदर, वरिष्ठ उपाध्यक्ष विजय जाधव, राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, मुख्य संघटन सचिव परसराम गोंडाणे, विभागीय अध्यक्ष दादाराव भोंगळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष नितीन जाधव, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा अमरावतीचे अध्यक्ष राजेश गाडे, अमरावती विभागीय सरचिटणीस प्रा. कैलासराव इंगळे, तसेच राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कदम यांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.













