गूगल, चॅटजीपीटीच्या मदतीने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलेची १५ दिवसांत कुटुंबीयांशी पुनर्भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : गूगल सर्च, चॅटजीपीटी, पोलीस आणि कुडाळ तालुक्यातील पांडूर येथील जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रमाच्या पथकाच्या मदतीने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व निराधार असलेल्या ५० वर्षीय महिलेची १५ दिवसांत तिच्या कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून आणण्यात संस्थेला यश आले आहे.

छाया निकम ही महिला दि.१८ सप्टेंबर रोजी कुडाळ तालुका पोलिसांना झाराप तिठा येथे आढळून आली त्यानंतर त्यांना निवारा व काळजीसाठी संविता आश्रमात दाखल करण्यात आले होते. आश्रमात वास्तव्यास असताना पथकाने त्यांच्या ओळखीबाबत आणि मूळ गावाबाबत काही अपूर्ण माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी गूगल सर्च आणि चॅटजीपीटीच्या मदतीने त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.

अखेर दि.४ ऑक्टोबर २०२६ रोजी पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांच्या तसेच रामनवाडी गावच्या पोलीस पाटलांच्या सहकार्याने कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक मिळवण्यात आले. त्यानुसार छाया यांचा मुलगा रवी निकम,त्यांची बहीण करिश्मा आणि मेहुणे रमेश पवार दि.५ ऑक्टोबर रोजी संविता आश्रमात पोहोचले आणि छाया यांना घरी घेऊन गेले.

ही पुनर्भेट संविता आश्रमातील देव सावंत आशिष कांबळी, विजया कांबळी तसेच परिचारिका प्रतीक्षा सावंत आणि दिव्या चव्हाण यांच्या प्रयत्नांतून शक्य झाली. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप परब यांनी पथकाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तंत्रज्ञान आणि समाजाच्या समन्वित प्रयत्नांमुळे असुरक्षित व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडता येते, हे या प्रकरणातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!