जलसंधारणासाठी विद्यार्थी सरसावले; कलमठमध्ये एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

कणकवली (प्रतिनिधी) : जलसंधारणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवतानाच प्रत्यक्ष श्रमदानातून पाणी अडविण्याचा संदेश देण्यासाठी कणकवली येथील एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. शाळेच्या वतीने कलमठ-गावडेवाडी येथे बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष श्रमदान केले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना मोठे महत्त्व आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने एस. एम. हायस्कूलच्या वतीने कलमठ गावडेवाडी परिसरात हा बंधारा बांधण्यात आला.

या श्रमदान उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच पप्पू यादव, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, स्वाती नारकर, ईशान फाटक आदी उपस्थित होते.

एस. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक गंगाराम बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मिलिंद गुरव, योगिता गावित, महेश प्रभू तसेच गावडेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी आंगणे, गोवेकर आणि सुमारे १०० विद्यार्थ्यांनी बंधारा बांधकामात प्रत्यक्ष सहभाग घेत श्रमदान केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने काम करत जलसंधारणाचा संदेश कृतीतून दिला.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. जलसंधारणाची कामे केवळ प्रशासन किंवा ग्रामपंचायतीपुरती मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सहभागी होणे गरजेचे आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

यावेळी सरपंच संदिप मेस्त्री यांनी एस. एम. हायस्कूलचे आभार मानत, विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जलसंधारणाच्या कामात घेतलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारलेला हा बंधारा भविष्यात पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त ठरणार असून, परिसरातील नागरिकांसाठीही तो प्रेरणादायी ठरेल.

error: Content is protected !!