कणकवलीत ख्रिस्ती बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी द्या !

नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या ख्रिस्ती समाजबांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ख्रिस्ती समाजाच्या वतीने कणकवली नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांना त्यांच्या दालनात सादर करण्यात आले. शहरातील ख्रिस्ती समाजबांधवांची अनेक वर्षांपासूनची ही गरज लक्षात घेऊन नगरपंचायतीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

कणकवली शहरात ख्रिस्ती समाजाची ३० हून अधिक कुटुंबे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा भाग असलेल्या या समाजाला मात्र अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे समाजातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी तालुक्यातील वरवडे गावातील फणसनगर येथील ख्रिस्ती समाजाच्या स्मशानभूमीत जावे लागते. परिणामी, शहरात राहणाऱ्या ख्रिस्ती कुटुंबांना अंत्यविधीच्या वेळी गैरसोयींचा सामना करावा लागतो.

फणसनगर येथील स्मशानभूमी ही तेथील स्थानिक ख्रिस्ती समाजाच्या वापरासाठी असल्याने कणकवली शहरातील ख्रिस्ती समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मृत व्यक्तीचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करणे हा प्रत्येक समाजाचा महत्त्वाचा सामाजिक आणि भावनिक विषय आहे. अशा संवेदनशील प्रसंगी कुटुंबीयांना दूरच्या ठिकाणी जावे लागू नये, तसेच अंत्यविधीची व्यवस्था करताना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी शहरातच स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची भूमिका ख्रिस्ती बांधवांनी मांडली आहे.

कणकवली नगरपंचायतीने शहरातील ख्रिस्ती समाजाच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून स्वतंत्र स्मशानभूमीसाठी योग्य जागा निश्चित करावी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मशानभूमी मंजूर करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!