विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश; बोर्डवे ग्रामपंचायतीवर ठाकरे शिवसेनेचा सरपंच बसविण्याचा शोभा बागवे यांचा निर्धार
तालुकाप्रमुख राजू राठोड, प्रथमेश सावंत यांच्या उपस्थित
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख शोभा बागवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशामुळे कणकवली तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
शिंदे गटात गेली पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही विकासकामे आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त करत शोभा बागवे यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यापुढे दादागिरी सहन केली जाणार नाही, तसेच बोर्डवे ग्रामपंचायतीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सरपंच बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सुशांत नाईक यांच्याकडून शोभा बागवे यांचे स्वागत
पक्षप्रवेशावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी शोभा बागवे यांचे ठाकरे शिवसेनेत स्वागत केले. त्यांच्यावर झालेला अन्याय आणि पक्षातील परिस्थितीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे नाईक यांनी सांगितले.
बोर्डवे गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच संघटनात्मक पातळीवर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कळसुली विभागात संघटनात्मक जबाबदारी स्वीकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आणि हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना सुशांत नाईक म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची भावना लोकांमध्ये आहे. भाजप सरकारच्या कारभाराबाबत असलेला सर्वसामान्यांचा असंतोष या पक्षप्रवेशातून दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी काळात कणकवली तालुक्यात ठाकरे शिवसेनेची संघटना अधिक मजबूत केली जाईल. बोर्डवे ग्रामपंचायतीवर ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पाच वर्षे काम करूनही विकासकामे झाली नाहीत : शोभा बागवे
पक्षप्रवेशानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना शोभा बागवे म्हणाल्या, “गेली पाच वर्षे आम्ही शिंदे शिवसेना पक्षात इमानदारीने काम केले. मात्र, आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिले गेले नाही. गावातील रस्त्यांसह आवश्यक विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे यापुढे दादागिरी सहन करून घेतली जाणार नाही.”
आगामी निवडणुकीत बोर्डवे ग्रामपंचायतीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सरपंच बसविण्यासाठी आपण दिवस-रात्र काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ पक्षप्रवेश करून थांबणार नसून, गावाच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आठ गावांमध्ये संघटना मजबूत करण्यावर भर : बबली राणे
कळसुली विभागप्रमुख बबली राणे यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. आगामी काळात ठाकरे शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी कळसुली विभागात जीव तोडून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“२०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कळसुली विभागातील आठ गावांमध्ये संघटना मजबूत करून ठाकरे शिवसेनेचा सरपंच निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
या पक्षप्रवेशा दरम्यान यावेळी शिंदे शिवसेना प्रवेश कर्त्या स्नेहा जाधव, वैशाली जाधव, सुशीला जाधव, श्रद्धा जाधव, सविता परब, वनिता परब, पूजा भिसे, अनिता मोडक, सविता शिंदे, रोहिणी एकावडे, सागर जाधव, ओंकार जाधव, अक्षय जाधव, सुरेश जाधव, रमेश कराळे, विक्रम जाधव आणि दशरथ परब यांच्यासह शिंदे गटातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.
अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
कणकवली तालुका प्रमुख राजू राठोड, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख प्रतीक्षा साटम, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, रुपेश आमडोसकर, पराग म्हापसेकर, रोहित परब, कळसुली विभागप्रमुख बबली राणे, कळसुली उपविभागप्रमुख शरद साळवी, बोर्डवे येथील ठाकरे शिवसेनेचे बूथप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड, कसवण शाखाप्रमुख संतोष गुरव, माजी सरपंच संतोष राणे, माजी सरपंच अहमद शेख, ग्रामपंचायत सदस्य नीलक्षी सोहनी,निलेश परब, विनोद परब, पांडुरंग कारेकर, यांच्यासह अनेकउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
कणकवली तालुक्यातील स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने शोभा बागवे यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः बोर्डवे ग्रामपंचायतीवर आपला सरपंच निवडून आणण्याचा निर्धार आणि कळसुली विभागातील आठ गावांमध्ये संघटनात्मक ताकद वाढविण्याची घोषणा यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने आपली रणनीती स्पष्ट केली आहे.












