आचरा (प्रतिनिधी) : डॉ. गजानन (जी. पी.) रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशनतर्फे आयोजित नवव्या ‘कार्डिओकॉन परिषद २०२६’चे मुंबईतील हॉटेल ‘द ललित इंटरनॅशनल’ येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. या वैद्यकीय परिषदेला राज्यभरातून १,४०० हून अधिक डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी उपस्थिती लावली.
या परिषदेचे उद्घाटन मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय स्थानिक आमदार मुरजी पटेल, ऑस्कर पुरस्कार विजेते प्रख्यात गायक सुखविंदर सिंग, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर, पद्मभूषण पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. ए. बी. मेहता आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. सी. व्यंकट एस. राम यांची विशेष उपस्थिती लाभली.
‘जय हो’ या गाजलेल्या गीतासाठी प्रसिद्ध असलेले गायक सुखविंदर सिंग यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी परिषदेत चैतन्य निर्माण केले. गुरुकृपा हार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, चांदीची समई आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले.
या प्रसंगी नगरसेवक प्रकाश मुसळे, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर आणि शासकीय अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हृदयरोगशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानावर सखोल चर्चा
या परिषदेत जागतिक स्तरावरील १६ तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध मार्गदर्शनपर सत्रे घेतली. हृदयरोगशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, नवीन संशोधन, वैद्यकीय उपचारपद्धती आणि या क्षेत्रातील प्रगती यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
प्रमुख वक्त्यांमध्ये प्रा. डॉ. ए. बी. मेहता, प्रा. डॉ. सी. व्यंकट एस. राम, डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. दर्शन झाला, डॉ. विवेक मेहान, डॉ. गिरीश परमार, डॉ. सदानंद शेट्टी आणि डॉ. एस. आंबर्डेकर यांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनपर सत्रांमधून उपस्थित डॉक्टरांना हृदयरोगविषयक नवीन माहिती, संशोधन आणि उपचारांतील प्रगती जाणून घेण्याची संधी मिळाली.
आयोजनासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे योगदान
ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. गजानन रत्नपारखी यांच्यासह डॉ. स्मृती रत्नपारखी, डॉ. राम चव्हाण, डॉ. अनिल कुमार उल्गडी, डॉ. शशांक शहा, डॉ. राजेश तिवारी, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. प्रियंवदा (अध्यक्ष, अंधेरी मेडिकल असोसिएशन), डॉ. मोना गांधी, डॉ. सीमा तिवारी, डॉ. नीता ममतौरा (अध्यक्ष, मेडिकल क्लब ऑफ विलेपार्ले), डॉ. गजानन काटे, डॉ. दीपाली काटे, सागर पांढरे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. समीर पाटील, डॉ. सुहास वोरा, डॉ. प्रशांत शिंदे (अध्यक्ष, KSDA) आणि डॉ. येवले (अध्यक्ष, GMA) यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीने मोलाचे योगदान दिले.
हृदयरोगशास्त्रातील नवीन ज्ञान, संशोधन आणि आधुनिक उपचारपद्धती यांवर विचारमंथन घडवून आणणारी ही परिषद वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठी महत्त्वपूर्ण ठरली.












