श्रमदानातून गणेशघाट स्वच्छता आणि जलसंधारण बंधारे

काळसे गोसावीवाडी ग्रामस्थांचा सातत्यपूर्ण आदर्शवत उपक्रम

चौके (प्रतिनिधी) : काळसे गोसावी वाडीतील ग्रामस्थ व तरुणांनी शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी श्रमदान करून गणेश विसर्जनानंतर अस्वच्छ झालेला गणेश घाट तसेच नाल्याची साफसफाई केली. नाल्यातील निर्माल्य, प्लास्टिक कचरा, फटाक्याचा कचरा सर्व साफ करून नाला स्वच्छ केला तसेच गणेश घाटातील सर्व गाळ काढून येथीलच पक्क्या बंधाऱ्याची गळती थांबवून त्यालगत छोटा मातीचा जलसंधारण बंधारा बांधला. तसेच सिद्ध महापुरुष मठ व गोसावीवाडीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच यावेळी गोसावी वाडीमधून वाहणाऱ्या नाल्यावर तीन जलसंधारण बंधारे बांधण्यात आले.

यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गेली कित्येक वर्षे घटस्थापने पूर्वी गोसावीवाडीतील ग्रामस्थ वाडीतील गणेश घाट, नाला, आणि सिद्धमहापुरुष मठ परिसराची साफसफाई करून जलसंधारण बंधारे बांधत आहेत. तसेच भविष्यातील पाणी समस्येचा विचार करून दुरदृष्टीने गोसावी वाडीतील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी व सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध महापुरुष उत्कर्ष मंडळ व ग्रामस्थांच्या योगदानातून १५ ते २० वर्षापूर्वी बामणदेव व गोसावीवाडीलगत वाहणाऱ्या नाल्यावर चार ठिकाणी पक्के बंधारे श्रमदान करून आणि लोकवर्गणी गोळा करून बांधले आहेत. हा समाजासमोर फार मोठा आदर्श आहे.

दरम्यान शनिवारी करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीम, गाळ काढणे व बंधारा बांधणे या उपक्रमात वाडीतील सतीश ऊर्फ बाळू गोसावी, सहदेव गोसावी, ओंकार गोसावी, प्रभाकर गोसावी, संतोष गोसावी, रामचंद्र गोसावी, भरत गोसावी, महेश गोसावी, सुहास गोसावी, नंदकुमार गोसावी, अमोल गोसावी, मंगेश गोसावी, सुरेश गोसावी, विजय गोसावी, बाळा गोसावी, गणपत गोसावी, संजय गोसावी, सुरेश गोसावी, विश्वेश गोसावी, कुणाल गोसावी, यश गोसावी, जितेंद्र गोसावी, पत्रकार अमोल गोसावी, प्रविण गोसावी, सोहम गोसावी, दशरथ गोसावी, सतीश गोसावी, श्रीधर गोसावी, किरण गोसावी आदी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन श्रमदान केले.

error: Content is protected !!