काळसेत नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ, दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजन

विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर यांच्या वतीने श्री देव रवळनाथ मंदिर नजिक रविवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करून नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. गेली अनेक वर्षे बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होत आहे.

या नवरात्रोत्सवानिमित्त रविवार ११ ऑक्टोबर ते बुधवार २१ ऑक्टोबर दरम्यान भरगच्च धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज स्थानिक तसेच पंचक्रोशितील निमंत्रित भजन मंडळाची सुस्वर भजने, रात्रौ गरबा नृत्य होणार असून विशेष कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वाजता महेश परब पुरस्कृत हेरंब पारंपारीक दशावतार लोककला नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वाजता किरण राऊळ पुरस्कृत भैरव जोगेश्वरी महिला फुगडी संच कुडाळ यांचा फुगडी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वाजता योगेश राऊळ, सुहास काळसेकर, अनु राऊळ पुरस्कृत कालिका देवी बाल दशावतार नाट्य मंडळ डिगस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. त्याचबरोबर रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वाजता संतोष सावंत पुरस्कृत वेषभुषा स्पर्धा आयोजित केली आहे. सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता नितीन राऊळ पुरस्कृत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता प्रताप चव्हाण पुरस्कृत स्वराज्य बिट्स झाराप या वाद्यवृंदाच्या जल्लोषात दुर्गामातेची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. आणि त्यानंतर रात्रौ या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या संपूर्ण सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!