कणकवली तालुका टू व्हीलर असोसिएशनचा जलसंधारणासाठी पुढाकार!

वागदे मांगरवाडीत संघटनेच्या वतीने वनराई बंधाऱ्याची उभारणी

कणकवली (प्रतिनिधी) : पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा जलसंवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कणकवली तालुका टू व्हीलर असोसिएशनच्या वतीने वागदे मांगरवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. असोसिएशनचे रजिस्टर अध्यक्ष श्री. नितीन तावडे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, भूजलपातळी वाढविण्यास हातभार लावणे तसेच उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना करणे, ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणीवेतून कणकवली तालुका टू व्हीलर असोसिएशनने वनराई बंधारा बांधण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. केवळ दुचाकीस्वारांची संघटना म्हणून मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा आदर्श या उपक्रमातून समोर आला आहे.

वनराई बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होऊन परिसरातील जलसाठा वाढण्यास हातभार लागणार आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांतूनच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भरीव योगदान देता येऊ शकते.

कणकवली तालुका टू व्हीलर असोसिएशनने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. सामाजिक उपक्रमांतून पर्यावरणाचे रक्षण आणि जलसंधारणाला चालना देण्याची संघटनेची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे.

error: Content is protected !!