कणकवली ते गोवा मार्गावर MEMU लोकल ट्रेन सुरू करा

खासदार नारायण राणे यांच्याकडे पं. स सदस्य मानसी मराठे यांची मागणी ; मिलिंद मराठे यांनी निवेदन केले सादर

रेल्वे प्रवासामुळे वेळेची आणि पैशांची बचत होऊन विद्यार्थी, नोकरदारांसह सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार दिलासा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ते गोवा या कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी MEMU (Mainline Electric Multiple Unit) लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मानसी बाळकृष्ण मराठे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बाळकृष्ण उर्फ मिलिंद मराठे यांनी सदर निवेदन खा.नारायण राणे यांच्याकडे सुपूर्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक-युवती, नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिक कामानिमित्त दररोज गोवा राज्यात ये-जा करतात. सध्या बहुतांश प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, वाढती वाहतूक, प्रवासासाठी लागणारा अधिक वेळ आणि अपघातांचा धोका यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली ते गोवा मार्गावर लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे पं. स सदस्य मानसी मराठे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

रेल्वे प्रवास हा तुलनेने सुरक्षित, वेळेची बचत करणारा आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा पर्याय आहे. त्यामुळे कणकवली ते गोवा या मार्गावर MEMU लोकल ट्रेन सुरू केल्यास विद्यार्थी, नोकरदार युवक-युवती, व्यापारी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. नियमित प्रवास करणाऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होईल. तसेच महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासही हातभार लागू शकतो. सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्यातील दैनंदिन संपर्क अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोकण रेल्वे मार्गावर स्थानिक प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन नियमित लोकल स्वरूपाची सेवा उपलब्ध झाल्यास रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने गोव्यात जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल. विशेषतः दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

त्यामुळे प्रवाशांची वाढती गरज आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन कणकवली ते गोवा या मार्गावर MEMU लोकल ट्रेन सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती मानसी बाळकृष्ण मराठे यांनी खासदार नारायणराव राणे यांच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!