खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी) : शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्यांची जोड मिळाल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या संस्थेच्या वतीने येथील महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांनी ज्ञानदा गुरुकुल, पुणे यांच्या माध्यमातून आयोजित एक महिन्याचे प्लंबिंग प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून या सर्व विद्यार्थ्यांची पुढील अडव्हान प्रशिक्षणासाठी पुणे येथे निवड झाली आहे.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, त्यांची स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणेही महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि भविष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या दृष्टीने प्लंबिंग प्रशिक्षणाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
ज्ञानदा गुरुकुल, पुणे यांच्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन प्रशिक्षक गणेश खंडाळे यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना प्लंबिंग क्षेत्रातील तांत्रिक बाबी, आवश्यक साधनांचा वापर आणि प्रत्यक्ष कामासाठी उपयुक्त असलेल्या कौशल्यांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख होण्यास मदत झाली.
नुकताच या विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम खारेपाटण हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रविण लोकरे, खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, प्राध्यापक कोकाटे सर, देसाई सर, ज्ञानदा गुरुकुल, पुणे चे कोकण प्रांत मोबिलायझेशन ऑफिसर अमित नाईक तसेच प्रशिक्षणाचे मार्गदर्शक गणेश खंडाळे उपस्थित होते. पुण्यातून ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून ज्ञानदा गुरुकुलचे संचालक मिलिंद डांगी सर, सी.ई.ओ अभय थिटे सर, सोमनाथ कुलकर्णी सर तसेच इतर शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. विद्यार्थ्यांची मनोगते प्रभावशाली व प्रेरणादायक होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाताडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुबोध देसाई सर यांनी केले.












