सावंतवाडी बाजारपेठेत चप्पल दुकानाला लागली आग

संजू निपाणीकर यांचे लाखोंचे नुकसान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील बाजारपेठेतील व्यावसायिक संजू निपाणीकर यांच्या चप्पल दुकानाला अचानक भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना पहाटे साडेचार वाजता घडली. त्याठिकाणी बाजारपेठ मित्र मंडळ आणि व्यापाऱ्यांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात यश आले, तरीही या आगीत चार ते पाच लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पहाटेच्या वेळी ही आग लागल्याने शेजारील संपूर्ण दुकानांच्या रांगेला मोठा धोका निर्माण झाला होता. जर ही आग वेळेत नियंत्रणात आली नसती, तर संपूर्ण बाजारपेठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती होती. मात्र, बाजारपेठ मित्र मंडळाचे सदस्य आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे आगीची तीव्रता इतरत्र पसरली नाही आणि पुढील अनर्थ टळला.

व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पुंडलिक दळवी यांनी या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी अमोल शितोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या दुर्घटनेत निपाणीकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी व्यापारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि इतर दुकाने सुरक्षित राहिली.

error: Content is protected !!