सायबर गुन्हे होवू नये म्हणून प्रत्येकाने जागृत होणे आवश्यक आहे – संजय कातीवले…!

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वृत्तपत्र वाहक राजेंद्र चव्हाण यांचा वाचनालयातर्फे सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपी हा हजार किलोमीटरच्याही पुढून गुन्हा करत असतो या गुन्ह्याची उकल झाली तरी शंभर टक्के रक्कम परत मिळेल याची खात्री नसते यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आचरा येथे केले.

वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून उन्हापावसाची पर्वा न करता दररोज पहाटे दुकानावर वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी झटणाऱ्या वृत्तपत्र वाहक राजेंद्र यशवंत चव्हाण कनेडी यांचा सन्मान रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या हस्ते संपन्न झाला या वेळी ते बोलत होते.यावेळी ग्रंथप्रदर्शनाचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन उर्फ दादा बापर्डेकर, सदस्य विरेंद्र पुजारे, बँक ऑफ महाराष्ट्र च्या क्षमा कारेकर, ग्रंथपाल विनिता कांबळी, माजी केंद्र प्रमुख सुगंधा गुरव, सांस्कृतिक समितीच्या कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, गोट्या आचरेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, सौ तन्वी जोशी, वाचनालय कर्मचारी महेश बांपर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण, होमगार्ड त्रिंबककर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बँक ऑफ महाराष्ट्र च्या क्षमा कारेकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र च्या ग्राहकांसाठी केवायशी अद्ययावत करण्यासाठी बंद वापरात नसलेली खाती नियमित करण्यासाठी आवाहन केले. याबाबत बोलताना त्यांनी बंद असलेली, वापरात नसलेली तसेच केवायसी अद्ययावत नसलेली खाती आणि ज्या खात्यांमध्ये नामनिर्देशन (Nomination) नोंदविलेले नाही, अशा खातेदारांची यादी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत तसेच संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित ग्राहकांनी यादीमध्ये आपले नाव तपासून, आवश्यक असल्यास केवायसी अद्ययावत करणे, खाते नियमित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणे किंवा खात्यात नामनिर्देशन नोंदविणे यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत शाखेशी संपर्क साधावा.

तसेच, आपल्या परिचयातील इतर कोणत्याही ग्राहकाचे नाव संबंधित यादीत असल्यास, त्यांनाही ही माहिती कळवून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कारेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिप सदस्या वर्षा सांबारी यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी मानले.

error: Content is protected !!