आरोपीच्यावतीने ऍड.अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शाळेमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी त्रिवेणी शिवनाथ हरिजन (सध्या राहणार दिगावळे, मुळ मध्यप्रदेश )याला सिंधुदुर्ग ओरोस येथील विषेश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक- १ एस.टी.त्रिपाठी यांनी पन्नास हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ऍड.अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
११/०९/२०२६ रोजी शाळकरी अल्पवयीन मुलीवर चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(२) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला ११/०९/२०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करताना आरोपीने पोलिस स्टेशनला हजेरी लावणे, तपासकामात सहकार्य करावे, फिर्यादीवर तसेच सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणू नये, फिर्यादीशी संपर्क साधू नये तसेच फिर्यादीचे राहत्या ठिकाणी जाऊ नये, सरकार पक्षाचे पुराव्यात ढवळाढवळ करू नये, परत इतर कोणताही गुन्हा करू नये अशा अटीसह जामीन मंजूर केला आहे.












