असलदे येथे स्ट्रीट लाईटची ५,५०० रुपयांची तार चोरी करताना तिघे पकडले…

संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल ; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी पकडली..

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील असलदे गावठणवाडी येथून रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईटची सुमारे १५० मीटर लांबीची अॅल्युमिनियमची वीजवाहक तार तोडून चोरी करण्याचा प्रकार गुरुवारी (१५ ऑक्टोबर) दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी सनी मधु सकट (वय २१), आणि राणी सनी सकट (वय २२) सिद्धार्थनगर, भालचंद्र बाबा मंदिरामागे, कणकवली) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरीच्या तारेची किंमत अंदाजे ५ हजार ५०० रुपये आहे. संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या नांदगाव शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले आकाश मधुकर बिडकर यांना गुरुवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास असलदे गावचे उपसरपंच सचिन चंद्रकांत परब यांनी दूरध्वनी करून या प्रकाराची माहिती दिली. असलदे गावठणवाडी येथून रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईटची वीजवाहक तार तोडून चोरी करताना तीन जण आढळल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर बिडकर यांनी महावितरणचे वायरमन सुनील सुरेश इंदप यांना घटनास्थळी पाठवले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वायरमन यांनी बिडकर यांना तेथे येण्यास सांगितले. त्यानुसार बिडकर घटनास्थळी पोहोचले. यावेळी उपसरपंच सचिन परब आणि संतोष अर्जुन घाडी यांनी संबंधित तिघांना स्ट्रीट लाईटची तार तोडताना पकडल्याची माहिती दिली.

घटनास्थळी असलेल्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सनी मधु सकट, राणी सनी सकट अशी सांगितली. त्यांच्याजवळ पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा स्कूटर होती. या स्कूटरला पुढे व मागे नंबर प्लेट नव्हती. स्कूटरची डिकी तपासली असता त्यामध्ये एमएच ०७ एएक्स ३४२७ क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट आढळून आल्या. संबंधित वाहनाचा हाच नोंदणी क्रमांक असल्याचे सनी सकट याने सांगितल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.

यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबंधित तिघे, स्कूटर आणि चोरीच्या संशयित तारेसह सर्वांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी नांदगाव महावितरणचे कनिष्ठ अभियंता आकाश बिडकर यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!