कणकवलीत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवा – नगरसेविका मनस्वी ठाणेकर

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याची बचत आणि भूजल पातळीत वाढ करण्यासाठी घरांच्या तसेच इमारतींच्या छतावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करावी. यासाठी शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबविण्यात यावा, शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती उभ्या होत आहेत त्यांनी त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करावी अशी महत्त्वपूर्ण सूचना नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी कणकवली नगरपंचायतीच्या सभेत केली.

सध्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेक घरांच्या आणि इमारतींच्या छतावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचा योग्य वापर करून ते जमिनीत मुरविल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठीही या उपक्रमाचा फायदा होऊ शकतो.

कणकवली शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ पाणीपुरवठ्यावर अवलंबून न राहता पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यावर भर दिल्यास भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होईल. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून घरमालक आणि इमारतींच्या मालकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी भूमिका नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी मांडली.पाणी बचत आणि पावसाच्या पाण्याचे संधारण यासाठी नगरपंचायतीने आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!