खारेपाटण एसटी स्टँड ते घोडेपाथर रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा!

पालकमंत्री नितेश राणे यांचा शब्द; संकेत शेट्ये यांची माहिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण एसटी स्टँड ते घोडेपाथर या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था आता दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने डांबरी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या मार्गावरील सुमारे ८०० मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचा शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला असल्याची माहिती संकेत शेट्ये यांनी दिली.

झुंझार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला भेट देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे खारेपाटण येथे आले होते. यावेळी एसटी स्टँडपासून नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी जात असताना संकेत शेट्ये यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष या मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याकडे वेधले. दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात पुराचे पाणी येत असल्याने रस्त्याचे नुकसान होते. डांबरी रस्ता वारंवार खराब होत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी वस्तुस्थिती त्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली. पालकमंत्री नितेश राणेंनी दिलेल्या शब्दामुळे स्थानिक नागरिकांची अनेक वर्षाची मागणी मार्गी लागण्याच्या दृष्टिक्षेपात आहे.

error: Content is protected !!