झुंझार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित भव्य ‘ढोलवादन ” स्पर्धेत

राजापूर येथील श्री धूतपापेश्वर नाडनकर पवार मंडळ संघ प्रथम

रोख २५,००० रुपये व झुंझार चषक -२०२६ चे ठरले मानकरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : झुंझार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने सार्वजनिक नारात्रोस्तव निमित्त शनिवार दि.१७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या ढोल वादन स्पर्धेत श्री देव धुतपापेश्वर नाडनकर पवार मित्र मंडळ राजापूर या संघाने ढोल वादनाचे वेशभूषासहित त उत्तम सादरीकरण करून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या संघाला मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते अंतिम विजेता संघाला रोख रुपये २५००० /- रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

सार्वजनिक नवरात्रोत्सव – २०२६ निमित गेले ६ दिवस झुंझार मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून, शनिवार मंडळाच्या वतीने खारेपाटण एस टी बस स्थानक परिसरात भच्य ढोल वादन स्पर्धा संपन्न झाली.या सर्धेमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व नामवंत एकूण ९ ढोल वादन पथके हजर झाली होती. यामध्ये श्री देव धुतपापेश्वर नाडनकर पवार मित्र मंडळ राजापूर या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या संघाला रोख रुपये २५,०००/- व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

तसेच या ढोल वादन स्पर्धेत श्री नवलादेवी ढोल पथक शेडे, राजापूर या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. या संघाला रोख रुपये १५,०००/- व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.तर श्री धूत पापेश्वर ढोल पथक राजापूर या संघाने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या संघाला १०,००० /- रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

झुंझार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या भव्य ढोल वादन स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९ ढोल पथकांनी सहभाग घेतला होता. तर यामध्ये एकूण १३५ वादकांचा समावेश होता.तब्बल ६ तास चाललेल्या या ढोल वादन स्पर्धे करिता परीक्षक म्हणून नितिन करंदीकर ( कोर्ले,ता.देवगड,) व प्रदीप चव्हाण (राजापूर) यांनी काम पाहिले. विजेत्या सर्व संघाचे मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेला खारेपाटण सह दशक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी झुंझार मित्र मंडळ खारेपाटण च्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!