तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
चिंचोडी पाटील येथे तलावाची पाहणी करून मच्छीमारांशी साधला संवाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच, आवश्यक मत्स्यबीजाची मागणी निश्चित करून त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शासन मच्छीमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री नितेश राणे यांनी चिंचोडी पाटील येथील तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तलावातील पाणीसाठ्याची सद्यःस्थिती जाणून घेतली तसेच मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मागण्या समजून घेतल्या.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधव दुहेरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि त्यानंतर निर्माण झालेल्या अवर्षणाच्या परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ताब्यात असलेले तलाव कोरडे पडत चालल्याने मत्स्यपालनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. परिणामी, मत्स्यबीज संचयन, माशांची वाढ आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊन मच्छीमार संस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
तलावांतील गाळ काढण्यावर भर
तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण झाल्यास मच्छीमार संस्थांना आगामी काळात मत्स्यपालनासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे या कामांना गती देण्याची आवश्यकता मंत्री नितेश राणे यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर किती मत्स्यबीजाची आवश्यकता आहे, याची माहिती संकलित करून मागणी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्यावरही त्यांनी भर दिला. या पाहणी आणि संवादामुळे जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाई, मत्स्यबीज संचयन आणि आर्थिक नुकसानीच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
नुकसानभरपाई, ठेका मुदतवाढीसह विविध मागण्या
यावेळी मच्छीमारबांधवांनी आपल्या अडचणी मांडताना सन २०२५-२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संस्थांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. मत्स्यबीज संचयनासाठी करण्यात आलेला खर्च तसेच माशांचे झालेले नुकसान याबाबत भरपाई मिळावी, अशी अपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली. ज्या तलावांमध्ये अद्याप काही प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे, तो माशांच्या वाढीसाठी उपलब्ध राहावा आणि पाटबंधारे विभागाने तो राखीव ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त भानुदास पालवे, प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, नाशिक संजय पाटील, प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, अहिल्यानगर दिनेश धोपे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ऋषिकेश ठाकरे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक अमित स्वामी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अमोल शेळके, जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष शरद बाचकर तसेच मच्छीमार बांधव उपस्थित होते.











