साने गुरुजी कथामाला मालवण समितीचा वाचनसंस्कृती जपणारा दहा वर्षांचा स्तुत्य उपक्रम
आचरा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मराठी साहित्याची ओळख व्हावी आणि भावी पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण तालुका समितीच्या वतीने आचरा येथील नामदेव शंकर कावले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना साधना प्रकाशनाचे बालकुमार दिवाळी अंक विनामूल्य भेट देण्यात आले. गेली दहा वर्षे सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत यंदा या शाळेची निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची अनोखी अक्षरभेट देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.
या उपक्रमासाठी आवश्यक दिवाळी अंक कै. सौ. सुमेधा सदानंद कांबळी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खरेदी करून साने गुरुजी कथामाला समितीकडे सुपूर्द केले जातात. त्यानंतर समितीमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या शाळांची निवड करून विद्यार्थ्यांना हे अंक विनामूल्य वितरित केले जातात. केवळ पुस्तके भेट देणे एवढाच या उपक्रमाचा हेतू नसून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांना मराठी साहित्याच्या विश्वाशी जोडणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
यंदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निवड करून विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची ओळख करून देण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला. इंग्रजी भाषेचे महत्त्व जपत असतानाच मातृभाषेतील साहित्याचे वाचन, लेखन आणि संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ कथामाला सदस्य तथा कै. सौ. सुमेधा सदानंद कांबळी चॅरिटेबल ट्रस्टचे सदानंद कांबळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने ती आत्मसात करणे आवश्यक आहे; मात्र अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या आपल्या मायमराठीचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी वाचन-लेखनाची सवय जोपासणेही गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी भेट मिळालेला दिवाळी अंक आवर्जून वाचावा, वाचनाची आवड असलेल्या इतरांनाही तो वाचण्यासाठी द्यावा आणि शक्य झाल्यास त्यावरील आपला अभिप्रायही कळवावा, असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समितीचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या नियोजनातून गेली दहा वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. यंदाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कथामालेच्या सचिव तथा निवृत्त केंद्रप्रमुख सुगंधा गुरव यांनी केले. वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी कथामाला समिती राबवत असलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला कथामालेच्या सुगंधा गुरव, सुरेश गावकर सर, स्थानिक समितीचे खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, शाळेच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडीस, उपमुख्याध्यापिका शीतल केरकर, शिक्षिका अस्मिता खेडेकर, सीमा पुजारे, रुपाली पाटकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
मोबाईलच्या वाढत्या वापराच्या काळात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक देऊन त्यांना वाचनाची प्रेरणा देणारा साने गुरुजी कथामाला समितीचा हा दहा वर्षांचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या अक्षरभेटीतून विद्यार्थ्यांच्या मनात मराठी साहित्यप्रेमाची बीजे रुजविण्याचा समितीचा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहे.












