सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषदेच्या मागील बाजूस मोबाईलवरून कल्याण नावाचा मटका घेत असताना एका संशयिताला सावंतवाडी पोलिसांनी पकडले. प्रवीण प्रमोद खटावकर (वय ३५, रा. कोलगाव चव्हाटावाडी, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ हजार २०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. आज दुपारी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मागील बाजूस ही कारवाई करण्यात आली.
संबंधित आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवरून कल्याण नावाचा मटका घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव प्रकाश भुजबळ यांनी फिर्याद दिली.











