संजीव निपाणीकर यांच्या आर्थिक मदतीला सरसावले चर्मकार बांधव

चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा सावंतवाडी ने केली 33 हजारांची मदत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील व्यावसायिक संजीव गणपतनिपाणीकर यांच्या बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग लागून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संकटसमयी समाजाची बांधिलकी जपत ‘सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी)’ यांच्यावतीने त्यांना ३३ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत देऊन दिलासा देण्यात आला आहे.दुकानाला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन मंडळाचे सचिव जगदीश चव्हाण यांनी समाजबांधवांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी सढळ हाताने मदत केली. यामध्ये सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी १० हजार रुपये, विजय चव्हाण यांनी ५ हजार रुपये आणि रवीकिशोर चव्हाण यांनी ५ हजार रुपयांची भरघोस मदत दिली. इतरही समाजबांधवांनी आपापल्या परीने हातभार लावला. जमा झालेली एकूण ३३ हजार ५०० रुपयांची रक्कम नुकतीच संजीव निपाणीकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. या मदतीतून संघटनेने समाजातील एकता आणि बंधुभावाचे दर्शन घडवून आणले आहे.या मदत वाटप प्रसंगी सावंतवाडी पालिकेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, मंडळाचे शाखाध्यक्ष विनायक चव्हाण, सचिव जगदीश चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सहसचिव बाबुराव चव्हाण, माजी अध्यक्ष गणेश म्हापणकर, दिलीप इन्सुलकर, विजय चव्हाण, मार्गदर्शक लक्ष्मण आरोसकर, रवीकिशोर चव्हाण, नरेश कारीवडेकर आणि दिनेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे सभासद व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटसमयी पुढे येऊन मदत करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे आणि उपस्थितांचे सचिव जगदीश चव्हाण यांनी आभार मानले.

error: Content is protected !!