कणकवली-फोंडा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल!

राजन चिके यांची खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्याची मागणी; अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली-फोंडा या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे बुजवावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता बागुल यांना लेखी निवेदन सादर केले आहे. कणकवली-फोंडा हा परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मुख्य मार्ग असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना या खड्ड्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांचे नियंत्रण सुटण्याची तसेच अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केवळ वाहनचालकच नव्हे, तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्याची तातडीने पाहणी करून रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी चिखले यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता या कामात कोणतीही दिरंगाई करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या मागणीची दखल घेऊन बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही न केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजन चिखले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे आता कणकवली-फोंडा मार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बांधकाम विभाग कोणती भूमिका घेणार आणि प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम कधी सुरू होणार, याकडे वाहनचालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!