पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपायांसाठी आता शास्त्रीय जलसंधारणाची चळवळ!

सिंधुदुर्गात साडेदहा हजार वनराई बंधाऱ्यांची उभारणी; जलसंधारणाचे शास्त्र गावागावांत पोहोचविण्यासाठी दोन हजार पुस्तकांचे वितरण

२० नोव्हेंबरला सिंधुदुर्गनगरी येथे ‘जलसंवाद’; पालकमंत्री नितेश राणे अध्यक्ष, माधव भंडारी प्रमुख वक्ते

ओरोस (प्रतिनिधी) : पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून चालणार नाही, तर जलसंधारणाचा शास्त्रीय दृष्टिकोन गावागावांत रुजवून दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना उभारण्याची गरज आहे. याच उद्देशाने सिंधुदुर्गात साडेदहा हजार वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीनंतर आता जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ‘जलसंवाद’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून प्रा. रमेश पाडव लिखित ‘जलसंधारणातून समृद्धी’ या पुस्तकाच्या दोन हजार प्रती जिल्ह्यातील कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख तथा जिल्हा बँक अतुल काळसेकर यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर उपस्थित होते. सिंधू आत्मनिर्भर अभियान आणि भगीरथ ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात ‘जलसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पाण्याची उपलब्धता आणि त्याचे नियोजन हा आता सर्वसामान्यांच्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. अलनिनो, हवामानातील बदल, पावसाची अनियमितता आणि वाढते तापमान यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. कोकणात भरपूर पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी भूजल पातळी झपाट्याने खाली जात असून नोव्हेंबर महिन्यातच काही ठिकाणची पाणीपातळी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असते तितकी खाली गेली आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन आणि कायमस्वरूपी जलसंधारणाची कामे करणे आवश्यक असल्याचे काळसेकर यांनी सांगितले.

कोविडच्या संकटकाळात समाजाने एकत्र येऊन संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याच काळात सिंधू आत्मनिर्भर अभियानाची सुरुवात झाली होती. त्याच धर्तीवर आता हवामान बदल आणि पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नावर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या संदर्भाने अधिक चर्चा होते; मात्र कोकणातील पाणी नियोजनाचाही स्वतंत्रपणे विचार होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वनराई बंधारे ही पाणी अडविण्याची तात्पुरती व्यवस्था आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर भूजल पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास आणि गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जलसंधारणाची कामे शास्त्रीय पद्धतीने करावी लागतील. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंधारणाचे शास्त्र सर्वसामान्यांना समजणे आवश्यक आहे. यासाठी सिंधू आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे.

दोन हजार पुस्तकांचे वितरण

प्रा. रमेश पाडव यांनी लिहिलेल्या ‘जलसंधारणातून समृद्धी’ या पुस्तकात जलसंधारणाची कामे सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत. अभियंता किंवा तज्ज्ञ उपलब्ध नसतानाही गावपातळीवर जलसंधारणाची कामे कशा पद्धतीने करता येऊ शकतात, याबाबत या पुस्तकातून मार्गदर्शन मिळते. त्यामुळे या पुस्तकाच्या सुमारे दोन हजार प्रती जिल्ह्यातील जलसंधारण चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुस्तकाच्या माध्यमातून जल संधारणाविषयी जागरूकता निर्माण करून गावागावांत शास्त्रीय पद्धतीने काम करण्याची प्रेरणा देणे, हा यामागील उद्देश आहे.

जुन्या जलसंधारण चळवळीचा अनुभवही येणार उपयोगी

सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची चळवळ राबविण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा परिषदेमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेले माधव भंडारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भिडे यांनी जिल्हाभर दौरे करून सुमारे १,७०० ते १,८०० बंधारे उभारण्याची चळवळ राबविली होती. त्या काळातील जलसंधारणाचा अनुभव आणि सध्याच्या परिस्थितीतील आव्हाने यांचा विचार करता माधव भंडारी यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात महत्त्वाचे ठरणार आहे.

‘उदक चालवावे युक्ती’ संकल्पनेतून जलसंवाद

‘उदक चालवावे युक्ती’ या संत रामदासांच्या अभंगातील विचाराला अनुसरून ‘जलसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे राहणार असून, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माधव भंडारी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात जलसंधारणाच्या विविध उपाययोजना, पाण्याचे नियोजन, भूजल पातळी वाढविण्याचे मार्ग आणि गावपातळीवरील सहभाग यावर संवाद होणार आहे. चर्चेसह प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार असून, जलसंधारणाची शास्त्रीय माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले.

error: Content is protected !!