ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्याला चापट लगावली, महिला पोलीस अमलदारांच्या वर्दीला हात
कणकवली (प्रतिनिधी) : एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या 30 वर्षीय मुलीने टल्ली होऊन मद्यधुंद अवस्थेत कणकवलीत अक्षरशः धिंगाणा घातला. एवढेच नव्हे तर फुल टू अवस्थेत ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्याला चापट लगावली आणि महिला पोलीस अमलदारांच्या वर्दीला हात घालण्याची हिम्मत त्या तरुणीने केली. याच घटनेची चर्चा कणकवलीत जोरदार सुरू आहे.याबाबत पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित मुलीवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशिगंधा दत्ताराम बागवे ( रा.फातिमानगर पुणे ) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रविवार 15 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कणकवली एसटी स्टँड समोरील एका हॉटेलसमोर संबंधित महिला मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करून गोंधळ घालत असल्याचा डायल 112 वर कॉल आला. याबाबत घटनास्थळी कणकवली पोलीस तसेच महिला पोलीसानी पोचून निशिगंधा हिला शांत राहण्यास सांगितले. तेव्हा निशिगंधा हिने पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या गणवेशाला हात घालुन धक्काबुक्की केली. त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी इनचार्ज एपीआय गणेश पवार यांना ही माहिती मिळताच तेही घटनास्थळी पोचले.परंतु निशिगंधा कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. निशिगंधा हिला कणकवली पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही तिने आरडाओरड करून पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच एपीआय गणेश पवार यांच्या डाव्या खांद्याला चापट मारली.तसेच ऑन ड्युटी महिला पोलीस हवालदार स्वप्नाली तांबे यांच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. मी फातिमानगर पुण्याची असून मला निशिगंधा दत्ताराम बागवे म्हणतात, तुम्हाला सर्वांना बघून घेते अशी धमकी दिली.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी निशिगंधा दत्ताराम बागवे हिच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 110, 117, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम 85 (1 )(a), बी एन एस चे कलम 121 (1), 132, 296, 351 (2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी निशिगंधा हिचे ब्लड सॅम्पल कणकवली पोलिसांनी घेतले होते.












