तीन वर्षांतच रस्त्याची दुरवस्था; पेंडूर ग्रामस्थ आक्रमक!

कुडाळ-पेंडूर ते कळसे- हुबळीचामाळ रस्त्याच्या निकृष्ट कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी; २३ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ-पेंडूर ते कळसे-हुबळीचामाळ या मार्गाचे बांधकाम होऊन अवघी तीन वर्षे झाली असतानाच रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या निकृष्ट कामाची सखोल तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि रस्त्याचे नव्याने दर्जेदार बांधकाम करावे, अशी मागणी पेंडूर ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे केली आहे. अन्यथा २३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता पेंडूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पेंडूर ते कळसे-हुबळीचामाळ हा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी त्रासदायक आणि धोकादायक बनले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शालेय विद्यार्थी, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना उपचारासाठी नेताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, खड्ड्यांमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात झीज होत असून, दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना अधिक इंधन खर्च होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक निधीतून बांधण्यात आलेल्या या रस्त्याची अवघ्या तीन वर्षांत अशी अवस्था होणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बांधकामाच्या दर्जाची केवळ वरवरची पाहणी न करता सक्षम व स्वतंत्र तांत्रिक यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी. बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य किंवा तांत्रिक निकषांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच रस्त्याचे केवळ तात्पुरते डागडुजीचे काम न करता नव्याने दर्जेदार व टिकाऊ बांधकाम करण्यासाठी तातडीने प्रशासकीय व आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दुरुस्ती करावी आणि कामाच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवावी, असेही निवेदनात नमूद आहे.

पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिरात जानेवारी महिन्यात होणारा देवाचा त्रैवार्षिक मांड उत्सव हा सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांसाठी महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा आहे. या उत्सवाच्या चौदा दिवसांच्या कालावधीत तालुक्यासह जिल्हा आणि राज्यभरातून लाखो भाविक पेंडूरमध्ये दाखल होतात. यामध्ये राजकीय नेते, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही सहभागी होतात. अशा महत्त्वपूर्ण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची ही दुरवस्था कायम राहणे चिंताजनक असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पेंडूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे. आंदोलनाची पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी प्रदीप आवळेगावकर, अमित रेगे, साबाजी सावंत, चंद्रशेखर फोडेकर, अमित सावंत, सतीश पाटील, सुरेश कांबळी, अजित साळुंके आणि संदेश (पप्या) नाईक उपस्थित होते.

error: Content is protected !!