देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे बेजबाबदार कचरा व्यवस्थापन

ॲड.आशिष लोके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायती मार्फत दारोदारी जावून जमा केलेल्या घन कच-याची (ओला व सुका) कायद्यातील तरतुदींनुसार विल्हेवाट लावली जात नसून मुख्याधिकारी, देवगड-जामसंडे नगरपंचायत हे बेजबाबदारपणे व बेफिकिरीने त्यांना प्राप्त अधिकाराचा गैरवापर करून जमा केलेला कचरा इतस्ततः टाकून परिसरातील मनुष्यजीवनास व जैवविविधतेस हानी पोचवत आहेत.

जमा केलेला कचरा टाकण्याकरीता देवगड पवनचक्की भागातील एका खाजगी जागेचा वापर केला जात आहे. ही जागा बंदीस्त नसून ती कचरा जमा करून ठेवण्याच्या जागेकरीता कायद्याने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करणारी नाही. तसेच सदरच्या खाजगी जागेस लागूनच जैवविविधतायुक्त असा जंगलामय भाग आहे.

जमा केलेल्या घन कच-यातील सुका कचरा हा नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी हे तेथेच जाळून टाकत असून त्या आगीचा परीसरातील झाडांवर व जैवविविधतेवर विपरीत परिणाम झालेला असून तेथील झाडे होरपळून गेलेली आहेत. जमा केलेला कचरा जाळणे हे कायद्यातील तरतुदींनुसार प्रतिबंधीत असून देखील सुका कचरा मुख्याधिकारी यांच्या आदेशावरून जाळून टाकण्यात येत आहे. प्लॅस्टीक युक्त सुका कचरा जाळून मुख्याधिकारी प्रचंड प्रमाणात वायू प्रदुषण देखील घडवून आणत आहेत.
सदरची जागा ही समुद्रसपाटीपासून उंचावर असून त्या जागेपासूनच उतार सुरु होतो. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. सदर जागेत जमा करण्यात येणा-या ओल्या व सुक्या कच-यामुळे पावसाचे पाणी प्रदुषीत होवून ते परीसरातील मनुष्यवस्तीतील विहीरींमध्ये तसेच पाण्याच्या इतर स्रोतांमध्ये मिश्रीत होणार आहे. असे प्रदुषीत पाणी पिऊन लोकांमध्ये विविध आजार पसरण्याची व जीवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे. परीसरातील वनस्पती तसेच प्राणीजीवनावर या सर्वाचा विपरीत परीणाम होणार आहे. सदरची जागा ही सी. आर. झेड. क्षेत्रात येत असण्याची देखील शक्यता आहे.

पवनचक्की येथील जागेमध्ये कचरा जमा करण्यापूर्वी जामसंडे येथील अनिल ठाकूर यांच्या जागेमध्ये कचरा जमा करण्यात येत होता. सदरची जागा देखील उंचावर असून जंगलमय भागातच आहे. त्यामुळे देखील प्रचंड प्रमाणात वायू व जल प्रदुषण होत आहे. अद्याप देखील त्या जागेमध्ये जमा केलेल्या कच-याचे ढीग तसेच पडून आहेत. वर नमुद दोनही जागा या बंदीस्त नसून तेथे जंगली जनावरे, गुरे-ढोरे, भटके कुत्रे इ. जावून कचरा खात असतात. त्यामुळे जनावरांमध्ये देखील रोगराई पसरून देवगड-जामसंडे परीसरातील नागरीकांमध्ये जीवघेण्या स्वरुपाचे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. या पूर्वी देवगड जामसंडे नगरपंचायती मार्फत पवनचक्की जवळ अन्य एका ठिकाणी कचरा टाकला जात होता. त्याबद्दल नागरीकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तेथे कचरा टाकणे बंद करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा तोच प्रकार मुजोरपणे करण्यात येत आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी, यांचे सदरचे कृत्य हे पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ नुसार गुन्हा असून त्या कायद्याचे कलम १५ नुसार शिक्षेस पात्र आहे. मुख्याधिकारी, देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्या या कृत्या मुळे पर्यावरणाच्या व नागरीकांच्या जिवीताच्या बाबतीत गंभीर अशी दखलपात्र घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तरी आपणास पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १९(१) नुसार प्राप्त अधिकारात आपणामार्फत या सर्व प्रकाराची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करण्यात येवून संबंधीत सर्व इसमांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच सदरचे पत्र हे त्याच कायद्याचे कलम १९(२) नुसार आवश्यक असणारी नोटीस असल्याचे गृहीत धरण्यात यावे. आपणाकडून या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास आम्हास सदरची बाब शासनाचे तसेच प्रशासनाचे पटलावर आणण्यासाठी आंदोलनात्मक भूमीका घ्यावी लागेल. अशा प्रसंगी निर्माण होणा-या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच असेल याची नोंद घ्यावी, असे या तक्रारीत म्हटले आहे.

error: Content is protected !!