कुडाळ ( अमोल गोसावी ): कुडाळ एसटी स्टॅण्ड येथून रात्री ७.४५ वाजता सुटणारी कुडाळ – सावंतवाडी या सावंतवाडी आगाराच्या बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवाशांमधून होते आहे. ही बस कुडाळ ते सावंवाडी मार्गावर धावणारी शेवटची लोकल थांबे घेणारी बस आहे. त्यामुळे कुडाळ येथून बिबवणे, तेरसे बांबर्डे, साळगाव, झाराप, आकेरी आणि सावंतवाडी येथे जाणाऱ्या प्रवाशांना उपयोगी असते. पण ही बस कुडाळ येथून रात्री ७.४५ सावंतवाडीकडे रवाना होते. मात्र, रात्री ८ च्या सुमारास कुडाळ येथे कोल्हापूर – कुडाळ, रत्नागिरी – कुडाळ, देवगड-वेंगुर्ले या लांब पल्ल्याच्या बस येतात. या बसेसमधून सावंतवाडी मार्गावर जाणारे प्रवासी अधिक असतात. मात्र, कुडाळ – सावंतवाडी बस रात्री ७.४५ ला रवाना होत असल्याने कोल्हापूर – कुडाळ, रत्नागिरी – कुडाळ, देवगड-वेंगुर्ले या बसने येणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी बस मिळत नाही. त्यामुळे सावंतवाडीकडे जाणाऱ्या लोकल प्रवाशांना खाजगी वाहनांद्वारे जावे लागते. त्यामुळे रात्री ७.४५ वाजता सुटणाऱ्या कुडाळ – सावंतवाडी बसच्या वेळेत बदल करून ती रात्री ८.०० वाजता कुडाळमधून मार्गस्थ करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. कणकवलीकडे जाणारी बस सुरू करण्याचीही मागणी तसेच रात्री ७ नंतर कुडाळ ते कणकवली या मार्गावर लोकल थांबे घेणारी बस उपलब्ध नाही. त्यामुळे पावशी, वेताळ बांबर्डे, ओरोस, कसाल, ओसरगाव या भागात जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो. या मार्गावर कोरोना काळापूर्वी बेळगाव – कणकवली ही बस धावत होती. ही बस सावंतवाडी, कुडाळ, ओरोस या मार्गावरील लोकल प्रवाशांना फायदेशीर होती. बेळगाव – कणकवली ही बस सावंतवाडीत रात्री ८.१०, कुडाळ ८.४० या दरम्यान दाखल होत असे. परंतु, ही बस सध्या पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतून ट्रेनने कुडाळ रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या प्रवाशांना बस उपलब्ध होत नसल्याने खाजगी वाहन पकडून घर गाठावे लागते. यात आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागतो. त्यामुळे बेळगाव – कणकवली किंवा सावंतवाडी – कणकवली अशी रात्री ८.३० च्या वेळी सुरू करावी, अशी मागणी प्रवशांमधून होत आहे.
कुडाळ-सावंतवाडी एसटी बसच्या वेळेत बदल करा – प्रवाशांची मागणी










