महाविकास आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा
कुडाळ ( अमोल गोसावी ) : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी टाळ मृदुंगाच्या तालावर विठू नामाचा गजर करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रांताचे, जाती, धर्माचे लोक आहेत. दरवर्षी हजारो लोक या आषाढी वारीच्यानिमित्ताने एकत्र येतात. त्यामध्ये या वारकऱ्यांच्या मोठया समूहावर शुल्लक कारणावरून लाठीचार्ज करण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केलेले आहे. जे हिंदुत्वाच्या विचाराचे सरकार म्हणून सांगतात त्यांनी हिंदुत्वाच्या विचारावर लाठीचार्ज केला ही निषेधार्थ बाब आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.