पेंडूरपाठोपाठ काळसे गावातही गवा रेड्यांकडून उच्छाद

भातशेतीसह , बागायतींचे करतायत नुकसान

वनविभागाने गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा! उपसरपंच अनिल सरमळकर यांची मागणी

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील पेंडूर गावामध्ये शेती बागायतीचे नुकसान करतानाच आता गवा रेड्यांनी गेले काही महिने काळसे गावाकडेही आपला मोर्चा वळविला असून शेतकऱ्यांची भातशेती सह बागायतीशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. काळसे गावातील शेतकऱ्यांनी भात पेरणी करून रुजलेला तरवाही गवा रेड्यांनी खाऊन तसेच भातशेतीतून नाचून त्याची नासधूस करत आहेत. खास करून काळसे नमसवाडी परीसरात गवारेड्यांच्या कळपाचा वावर अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे आधीच पावसाने पाठ फिरवल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना गव्या रेड्यांमुळे हतबल होऊन नुकसान सहन करावे लागत आहे. आपण केलेल्या मेहनतीवर गवा रेडे काही क्षणात पाणी फिरवत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आणि प्रत्यक्षात लावणी करण्यासाठी अजून किती वेळा भात पेरणी करावी लागेल या विवंचनेत आहे. गव्या रेड्यांनी काळसे गावातील महेश चव्हाण , प्रफुल्ल चव्हाण , शंकर सावंत , अनिल सावंत , संदिप शिंग्रे , हनुमंत आवळेगावकर, नारायण जाधव, संदिप गुराम , महेश परब , शरद पराडकर , बाबू देवसकर , अजित प्रभू, लक्ष्मण कोळगे , सखाराम आचरेकर , एकनाथ प्रभु , मोहन हळदणकर , कृष्णा हळदणकर , विश्राम प्रभु. चिंतामणी परब , शंकर परब , दिलीप परब , मधुकर प्रभु , महेश प्रभु, लक्ष्मण म्हापणकर , प्रमिला म्हाडदळकर , हरिश्चंद्र परब , विक्रम नाईक , विजय परब , हनुमंत परब , प्रमोद मयेकर, अरुण परब , रमेश परब या शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे. सदर नुकसानीची पाहणी करून वनविभागाने तातडीने उपद्रवी गव्या रेड्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काळसे गावचे उपसरपंच अनिल सरमळकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!