कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने आठवडा बाजाराच्या दिवशी म्हणजेच बुधवारी कुडाळ शहरात अवजड वाहनांना बंदी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चिरे, वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर यांचा समावेश आहे. संध्याकाळच्या वेळी मालवण मार्गाने येणारी अवजड वाहने कुडाळ पोस्टनजीक येताच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. या दृष्टीने दर आठवडा बाजारात दिवशी अवजड वाहनांना कुडाळ शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली. मात्र, या आठवडा बाजारात दिवशी सुद्धा अवजड वाहने कुडाळ शहरात येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी अवजड वाहनांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













