साळशी शाळेची आज घंटा वाजली

सहा दिवसांनंतर ग्रामस्थांच्या आंदोलनावर तोडगा

शिक्षणाधिकार्‍यांच्या भेटीत दोन तास यशस्वी चर्चा

देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील साळशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची घंटा तब्बल सहा दिवसांनंतर काल बुधवारी वाजली. ६ दिवसानंतर मुलांनी शाळेत प्रवेश केला. सेमी इंग्लिश विषय शिकवण्यासाठी बीएसस्सी बीएड शिक्षकाची नेमणूक करा या मागणीसाठी पालकांसह ग्रामस्थांनी दिवसरात्र जागून शाळा बंद आंदोलन पुकारले होते. अखेर प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी याची दखल घेत पालक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत जवळपास दोन तास झालेल्या चर्चेत यशस्वी तोडगा काढला. साळशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिश, विज्ञान, गणित विषय शिकवण्यासाठी बीएसस्सी बीएड शिक्षकच नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे विषय कच्चे राहतात. त्याचे परिणाम पुढे ८ वी माध्यमिक शाळेत गेल्यावर होतात आणि हीच खरी ग्रामीण भागातील समस्या असून विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडू लागले आहेत. यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी १५ जून रोजी पालकांसह ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसत मुलांना शाळेत न धाडण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांनंतरही आंदोलनावर सकारात्मक तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत २१ जूनला जिल्हा परिषदेसमोर मुले आणि पालकांसह धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर शिक्षणाधिकार्‍यांनी त्याची दखल घेतली आणि मंगळवारी उपोषणस्थळी भेट घेत ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी शिक्षण स्तर उंचावण्यासाठी (मूल्यमापन) नोडल अधिकार्‍याची नेमणूक केली जाईल, विषयतज्ज्ञ नेमणूक होईल आणि शिक्षक भरती होताच प्राधान्याने मागणीचा विचार करून बीएसस्सी बीएड शिक्षकाची नेमणूक करण्याचे लेखी आश्वासन शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी दिले. याच वेळी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी २७ जून रोजी पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शाळा नियोजनाचा वार्षिक आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही ही शिक्षणाधिकार्‍यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांचे सर्व विषय समजून घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच विलास गांवकर, साळशी ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, मुख्याध्यापक गंगाधर कदम यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटशिक्षणाधिकार्‍यांवर काय कारवाई होणार?

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उभारलेल्या ग्रामस्थांच्या लढ्यात सुरुवातीपासून प्रभारी असलेले गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी कसलीही सहकार्याची भूमिका दाखवली नाही. उलट पालक, ग्रामस्थांना धमकावत आंदोलन मागे घ्या अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंगळवारी गामस्थांनी आंदोलन मागे घेऊन स्वत: मुलांना शाळेत पाठवण्याचे ठरवले. मात्र याच गटशिक्षणाधिकार्‍यांनी साळशी शाळेतील शिक्षकांना शेजारील शिरगाव आणि चाफेड गावांतील शाळेत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केले. यामुळे शाळेत उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. अशा गटशिक्षणाधिकार्‍यांवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे साळशीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!