सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेऊ शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो, तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, भारतातील ही योग संस्कृती जागतिक पाळीवर बहुतांश देशांनी स्विकारली असून योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणात अनुभवले आहेत. तरी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियमितपणे योग करून आपले तन, मन तंदुरुस्त ठेवावे. असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले.
पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल म्हणाले, भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैंनदिन जीवनात केल्यास नक्कीच आपले शरीर, मन तंदुरस्त ठेऊ शकतो. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यानी वेळोवेळी योगाचे महत्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे.
योग प्रशिक्षक चंद्रकांत परब यांनी योग प्रात्यक्षिके यावेळी करवून घेतली. या योग शिबीरात 12 पोलीस अधिकारी व 125 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. प्रांरभी पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.












