गुरुकुल चा गुणगौरव सोहळा दिमाखात साजरा

सिंधुदुर्गातील शैक्षणिक प्रगती मध्ये गुरुकुल अकॅडमी चे योगदान उल्लेखनीय: माननीय आर जे पवार

कणकवली (प्रतिनिधी): डी. के. फाउंडेशन संचलित गुरुकुल अकॅडमी कणकवली या नामांकित क्लासेसच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल नगरवाचनालय हॉल कणकवली येथे गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. ‘गुरुकुलचे अनेक शैक्षणिक उपक्रम मी जवळून पाहिले आहेत .शहरातील व शहराबाहेरील गुरूलच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा चढता आलेख पाहता सिंधुदुर्गातील शैक्षणिक प्रगती मध्ये गुरुकुल अकॅडमीचे योगदान उल्लेखनीय आहे ,असे प्रतिपादन कणकवली तालुक्याचे तहसीलदार आर जे पवार यांनी याप्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविक विद्या घाणेकर यांनी करत गुरुकुलच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि गुरुकुल मध्ये होणाऱ्या नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये गुरुकुल विषयी कृतज्ञता व्यक्त करत यशामध्ये गुरुकुलचा वाटा मोलाचा असल्याचे नमूद केले. याप्रसंगी बोलताना इंडस हेल्थ प्लस चे एक्झिक्युटिव्ह सत्यवान मडवी म्हणाले,गुरुकुलमध्ये फक्त सुशिक्षित नाही तर सुसंस्कृत विद्यार्थी घडवले जातात.नरडवे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संभाजी कुंभार, गुरुकुल विज्ञान विभाग प्रमुख मुकुंद चिकोडी, वाणिज्य विभागाचे प्रमुख अक्षय हेदुळकर तसेच उपस्थित पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. गुरुकुल अकॅडमीचे संचालक दत्ता केसरकर म्हणाले, गेली नऊ वर्षे दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेत कोकण बोर्ड प्रथम क्रमांकावर आहे. परंतु बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या जेईई,नीट, एमएचटी-सीईटी यांसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांची प्रगती उदासीन असल्याने गुरुकुल यासाठी प्रयत्नशील असून लवकरच मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येतील. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी शिक्षक, पालक व विदयार्थी यांमध्ये सुसंवाद घडून येणे गरजेचे आहे असे सूचित केले. गुरुकुल अकॅडमी चा ‘टीचर ऑफ द इयर पुरस्कार’ विज्ञान विभाग प्रमुख मुकुंद चिकोडी यांना देऊन सन्मान करण्यात आला. सोबत ‘विशेष गुणगौरव पुरस्कारचा मान विवेका महाडेश्वर मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली कदम यांनी केले तर आभार मुकुंद चिकोडी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!