तालुक्यात भरडधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा वैभववाडी ता.ख.वि.संघा मार्फत होणार सन्मान
वैभववाडी (प्रतिनिधी): सध्याचे हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष जाहीर झाले आहे. भारतीय संस्कृतीत आरोग्याच्या दृष्टीने भरडधान्य अर्थात अन्न अत्यंत महत्त्वाचे आहे .याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी केंद्रामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण वैभववाडी तालुक्यात या भरड धान्या विषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ज्वारी,बाजरी,नाचणी,मका,कुट्टू,राजगिरा,कोंदरा,कुटकी,वरी, राळा या भरड धान्यापैकी वैभववाडी तालुक्यात जे शेतकरी भरड धान्य पिकवतील त्या शेतकऱ्यांचा वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघा मार्फत सन्मान करण्यात येईल असे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी सांगितले आहे. तसेच भरड धान्याचे उपयोग करून विविध पीठ तयार करणाऱ्या गृह उद्योग संस्थां व बचत गटांचा ही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे . वैभववाडी खरेदी विक्री संघा मार्फत लवकरच मिलेट महोत्सव आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आज एडगांव, वायंबोशी गावात कृषिविभागाच्या मार्फत मोफत “नाचणी” या भरड धान्य बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. या भरड धान्य वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.













