चौके हायस्कुलमध्ये रानभाजी पाककला स्पर्धा सपंन्न

स्थानिक संस्था अध्यक्ष बिजेंद्र गावडे व अनिल सुकाळी यांचा पुढाकार

चौके (अमोल गोसावी) : चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलीत भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या प्रशालेत शिकणाऱ्या नवीन पिढीतील मुलांना या श्रावण महिन्याच्या सुरवातीला निसर्गात मिळणाऱ्या पौष्टिक रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने या प्रशालेचे स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी रानभाजी पाककला स्पर्धा शाळेच्या सभागृहात घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेत प्रशालेच्या ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून बनवून आणलेल्या विविध रानभाज्या व त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सुंदर सादरीकरण केले. यामध्ये कुर्डू, अळू, अळमी, भारंगी, एक पानची भाजी, कुड्याच्या शेंगा, घोट्याचे वेल टायकुला या भाज्यांचा समावेश होता. या रान भाजी पाककला स्पर्धेचे परीक्षण तन्वी परब यांनी केले. यावेळी स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी,उपाध्यक्ष अनिल सुकाळी, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, पालक संघाचे उपाध्यक्ष मोहन गावडे, शामसुंदर मेस्त्री आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या रानभाज्यांचे उपस्थित मान्यवरानी पहाणी करुन भाज्यांची माहिती घेतली. स्पर्धा परिक्षण झाल्यानंतर प्रथम चार क्रमांकाना मान्यवऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक कु.आर्येश मेस्री, द्वितीय क्रमांक कु.अनुश्री गोसावी, तृतीय क्रमांक कु.नेहा कदम, उत्तेजनार्थ कु.चांदणी राजपूत याना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व मुलांनी रानभाज्या पहाण्यासाठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!