हरी खोबरेकर यांनी भेट देत केली पाहणी
चौके (अमोल गोसावी) : गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला. परिणामी लगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाकरे गट शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भेट दिली. याबाबतची माहिती त्यांनी आमदार वैभव नाईक, तहसीलदार यांना देत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यास झोडपून काढले आहे. नद्यांना पूर आले आहेत. यातच तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे नदीकिनारीपासून सुमारे ५० फूट अंतरावर नजीकच्या वस्ती असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. नदीकिनारी भाग अचानक खचल्याने त्याठिकाणी स्थानिक ग्रामस्थाची होडी बुडण्याच्या मार्गावर होती. ती होडी इतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढली. याची माहिती मिळताच घटनास्थळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख खोबरेकर यांनी भेट देत पाहणी केली व शिवसेना आमदार वैभव नाईक तसेच तहसीलदार यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली व याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सध्याच्या बजेटमध्ये धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर करून कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बांधून देण्यात येईल परंतु तोपर्यंत तात्पुरती नेमकी कोणती उपाय योजना करता येईल याबाबत संबंधित खात्याशी लवकरच चर्चा करून आपण प्रत्यक्ष भेट घेऊन ठरवू अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांना तालुकाप्रमुख खोबरेकर यांच्या मार्फत दिली.
तहसीलदारांनी पेंडूर तलाठ्यांना घटनास्थळाची पाहणी करून योग्य तो पंचनामा करून अहवाल पाठवण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख कमलाकर गावडे, शाखाप्रमुख संतोष नागवेकर, शाखाप्रमुख निलेश हडकर, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, अक्षय भोसले, विजय पालव, प्रदीप आवळेगावकर, आनंद आवळेगावकर, प्रभाकर नागवेकर, प्रकाश सहदेव नागवेकर, रामचंद्र नागवेकर, अंकुश आवळेगावकर, सर्वेश नागवेकर, दीपश्री आवळेगावकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.











