सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : तळेरे वैभववाडी रस्त्यावर गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यातील आरोपी याळप्पा बाळाप्पा लोकूर, संतोष पवार, शंकर बसवंत देशनुर ( तिघेही रा. बेळगाव कर्नाटक ) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश भारुका यांनी फेटाळला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 9 फेब्रुवारी 2023 रोजी या गुन्ह्यात अवैध दारू भरलेल्या ट्रकसह 19 लाख 64 हजरांचा मुद्देमाल एक्साईज च्या भरारी पथकाने पकडला होता.या गुन्ह्यात चालक त्रिधन शिवाजी पवार ला अटक करण्यात आली होती. चालक पवार याने दिलेल्या जबाबनुसार वरील तिन्ही आरोपी या गुन्ह्यात सामील होते.मात्र त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता.त्याला हरकत घेताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी ट्रक मालक याळप्पा लोकूर याने ट्रक च्या हौद्यात जाणीवपूर्वक दारू तस्करी साठी चोरकप्पे तयार केले, चालक त्रिधन पवार ने दिलेल्या जबाबानुसार वरील तिन्ही आरोपी हे या गुन्ह्यात सामील असून सखोल तपासकामी त्यांची अटक होऊन चौकशी करणे आवश्यक आहे, वरील तिन्ही आरोपी फरार असून ते तपासकामी सहकार्य करणे टाळत आहेत, आणखी पुरावे न्यायालयासमोर आणणे आवश्यक असताना न्यायालयाची दिशाभूल करून अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे, फरार आरोपी हे परराज्यातील असून आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात समक्ष हजर राहण्याची शक्यता कमी आहे, वरील तिन्ही आरोपी हे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून त्यांची अटक करून सखोल चौकशी केल्याशिवाय तपास पूर्ण होणार नाही, परराज्यातील मद्य महाराष्ट्रात बाजारभावाने विकून महाराष्ट्र राज्याच्या महसुलाचे नुकसान करत असून आरोपी हे आंतरराज्य मद्य तस्करी टोळीचे सदस्य आहेत, फरार आरोपी अर्जदारांनी अटकेच्या भीतीने आणि या गुन्ह्यात सखोल तपास होऊन कोणतेही पुरावे सापडू नयेत यासाठी अटकपूर्व जामीन सादर केला आहे असे मुद्दे सरकारी वकील देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.सरकारी वकील देसाई यांच्या युक्तिवादा नंतर जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश भारुका यांनी तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.











