कुडाळ येथे महसूल सप्ताहानिमीत्त “एक हात मदतीचा” उपक्रमाचा शुभारंभ
कुडाळ (अमोल गोसावी ) : शासनाच्या कोणत्याही योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जाणारे अधिकारी व कर्मचारी त्यांची मानसिकता काय आहे त्यावर सरकार बाबतची प्रतिमा जनतेत तयार होत असते. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या महसूल दिनाचे औचित्य साधून एक हात मदतीचा या कार्यक्रमात एक बोलत होते.
कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह या उपक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ व तहसीलदार कार्यालय कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय ” एक हात मदतीचा “कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी करण्यात आला . यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण , जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल , जिल्हा परिषद मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अप्पर जिल्हाधिकारी संतोष बर्गे , प्रभाकर सावंत , निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे , परिक्षाविधीन जिल्हाधिकारी करीश्मा नायर , विशाल कत्री , कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे , तहसीलदार अमोल पाठक , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच अधिकारी कर्मचारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अर्थसाह्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. तसेच पुरात वाहून जाणाऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणाऱ्या धाडसी तरुणांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी पुढेबोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेला भारत आता तयार होत आहे लोकांपर्यंत योजना जात आहेत अजूनही काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज असून यामध्ये आपण यशस्वीतेकडे जाऊ. खऱ्या लाभार्थ्यापर्यंत त्याला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे योजना कितीही चांगली असली तरी ती लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जाणारा अधिकारी व कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे , जिल्ह्यातील तरुणांचे शहराकडे होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी तरुणांना जिल्ह्यातच कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर देण्याची गरज आहे त्यासाठी पालकमंत्री म्हणून लागेल ती मदत करायला मी तयार आहे असे सांगून त्यांनी पुरामध्ये वाहून जाणाऱ्यांना लोकांना ज्या धाडसी तरुणांनी वाचवले आहे त्यांना रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल असे सांगितले.
त्याचप्रमाणे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की , यापुढे येणारा प्रत्येक दिवस हा महसूल दिन म्हणून साजरा करायचा आहे. समाजातील दुर्बल घटक एखादा पुरावा नाही म्हणून शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील सर्व विभागांना सोबत घेऊन महसूल विभाग जनहितार्थ कार्य करत राहील. असे सांगून जिल्ह्यातील आठ पैकी सहा तहसीलदारांना नवीन वाहने मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले.













