कुडाळ येथील जखमी वायरमन धनंजय फाले याचे निधन

फाले यांच्या मृत्यूनंतर कंत्राटी कामगार संघटना आक्रमक

सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची अशोक सावंत यांची मागणी

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरा नजीक विद्युत कामावर काम करताना विद्युत तारांचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या महादेवाचे केरवडे येथील कंत्राटी वायरमन धनंजय फाले (वय २६) याचे उपचारादरम्यान १५ दिवसांनी निधन झाले. त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार व गावावर शोककळा पसरली आहे. कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरासमोर असलेल्या ११ केवी विद्युत खांबावर काम करण्यासाठी कंत्राटी कामगार धनंजय फाले हा २१ जुलै रोजी काम करत असताना त्याला विद्युत तारांचा शॉक लागून तो जखमी झाला होता. त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते.

विद्युत तारांचा शॉक लागून जखमी झालेल्या धनंजय फाले यांच्यावर गोवा बांबोळी येथे गेले १५ दिवस उपचार सुरू होते. आज ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. धनंजय फाले हा घरातील एकुलता एक कमवता युवक होता. त्याच्या पश्चात आई, वडील आहेत त्याच्या कुटुंबीयांना आता मदतीची गरज आहे. या मदतीसाठी यापूर्वी भाजप व कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता तसेच कंत्राटदार यांना घेराव घातला होता मात्र त्या नंतर कोणताही निर्णय झाला नव्हता. आता या युवकाच्या आई-वडिलांना मदतीची गरज आहे त्यांच्या एकुलता एक मुलाचे निधन झाले आहे.

या घटनेनंतर कंत्राटी वीज कर्मचारी संघटना आक्रमक बनली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी केली आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यात मागील ९ महिन्यात हा पाचवा बळी असून फाले कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटीबद्ध राहील अशी प्रतिक्रिया अशोक सावंत यांनी दिली.

error: Content is protected !!