कणकवली (प्रतिनिधी): कणकवली कॉलेज कणकवली, कनिष्ठ महाविद्यालय + २ स्तर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचा शुभारंभ व स्वयंसेवक स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे तसेच पर्यवेक्षक प्रा. ए. पी. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. के. जी. जाधवर, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. सी. सावंत, प्रा. व्ही. आर. सावंत, सहा. कार्यक्रमाधिकारी सौ. व्ही. एस. सावंत, सौ. पी. एम. सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, उत्तम स्वयंसेवकच आदर्श राष्ट्र व समाज निर्माण करू शकतो. चांगल्या कृतिशील विचारांचे बीजारोपण व कष्टाची सवय अशा उपक्रमामधूनच लागते. विद्यार्थ्यांची सामाजिकरणाची प्रक्रिया महाविद्यालयीन काळात सुरू झाली पाहिजे. औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक व व्यावहारिक ज्ञान शालेय उपक्रमातून मिळत असते. विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व सर्व बाजूंनी संपन्न बनवण्याचा राष्ट्रीय सेवा योजना हा एक राजमार्ग आहे. युवकांच्या पुढाकारातूनच शक्तिशाली व बलशाली भारत घडून येईल.
प्रा. के. जी जाधवर म्हणाले, युवाशक्तीच्या जीवनाला दिशा मिळावी या उद्देशाने हा विभाग शासनाने सुरू केला आहे. ज्या समाजात आपण वाढतो, मोठे होतो त्या समाजाचे देणे आपण अशा उपक्रमातून फेडू शकतो. पर्यवेक्षक प्रा. ए. पी. चव्हाण म्हणाले, आपल्या देशाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय नेतृत्व तरुणांनी करावे त्यासाठी सामाजिक जाणीव व भान या उपक्रमातूनच शिकता येते. महाविद्यालयीन विद्यार्थी आज स्वतःहून समाजसेवेसाठी व देशसेवेसाठी या उपक्रमातून सहभागी होत आहेत याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक केले. प्रास्ताविकामध्ये प्रा. सौ. व्ही. एस. सावंत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि २४ तास ही संघटना समाज सेवेसाठी तत्पर असते असे सांगितले. योजनेची उद्दिष्टे व वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रातिनिधिक स्वरूपात दोन स्वयंसेविकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे ७० स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. व्ही. सी. सावंत यांनी केले आणि आभार सौ. पी. एम. सावंत यांनी मानले.
राष्ट्रीय सेवा योजना शुभारंभ व स्वागत समारंभ












