कुडाळ येथे ” रहस्य स्व नेतृत्वाचे” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमार्फत आयोजन
कुडाळ ( अमोल गोसावी ) : अंतर्मनातील आवाज कार्यसिद्धीच्या दिशेने माणसाला वेगात घेऊन जातो .नुसती प्रेरणा असून चालत नाही. तर त्याच्या जोडीला अंतर्मनाचा कौल महत्त्वाचा असतो .कारण प्रेरणा ही तात्पुरती असते तर अंतर्मनाचा आवाज हा कायमचा असतो त्याला सोबत घेऊन आपण आपल्यातील सुप्त गुणांची ओळख करून न्यूनगंड टाकून स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे”. असे उद्गार सीसीआय इंडियाचे संस्थापक तथा समुपदेशक राजेश कामथ यांनी काढले .ते बॅरिस्टर नाथ पै करियर अकॅडमी तसेच बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आयोजित रहस्य स्व नेतृत्वाचे या विषयांनुषंघाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये सिंहासन बत्तीशी, तेनालीराम च्या विविध कथांचा मथितार्थ व त्यातून आपल्या व्यक्तित्वासाठी कोणती प्रेरणा घेणे गरजेचे आहे; याचे रंगतदारपणे कथन केलं .”मनाची आत्मशक्ती ही प्रबळ असेल तर अशक्यप्राय गोष्ट सुद्धा शक्य करतं करता येते; हे तेनालीराम यांच्या विविध प्रसंगांचा दाखला देत त्यांनी अतिशय मनोरंजकपणे कथन केले. जगाची ओळख करायला जाताना स्वतःच्या क्षमता आणि स्वतःची ओळख असेल तर आपण समर्थपणे जगाला सामोरे जाऊ शकतो म्हणजेच स्व नेतृत्वातून स्वतःला सिद्ध करता येते. त्यासाठी आत्मविश्वासाची आणि स्वतःवरील निष्ठा व मूल्यांवरील तत्वं निष्ठेची गरज असल्याचे प्रतिपादन केले. राजेश कामथ हे सी.सी.आय. इंडिया चे संस्थापक अध्यक्ष असून ते देशभरात आत्मोन्न्ती व मनोविकास यामार्फत स्व नेतृत्व कसं विकसित करता येईल याबद्दल विवेचन करत असतात.
या मार्गदर्शन पर कार्यक्रमात कथनात्मक अंगाने पुराणातील विविध कथांचा संदर्भ देत त्यांनी विवेचन केले .यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी उपासना तेंडुलकर ,बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर ,सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे, बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, नर्सिंग महाविद्यालयाच्या सहयोआगी प्राध्यापक वैशाली ओटवणेकर, बॅ.नाथ पै महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज ,डॉ व्यंकटेश भंडारी,व शिक्षक- सहकारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.












