जामसंडे अपघाती मृत्यू प्रकरणी एस.टी.चालकाला जामीन मंजूर

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे दिर्बादेवी स्टॉप नजिक दि. ०८/०७/२०२३ रोजी सकाळी ६.१५ मे सुमारास दोन युवकांना रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जात ठोकर देवून एकाचा मृत्यू व दुसऱ्याच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस टी चालक संजय रविंद्र पाटील याला देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी.घाडगे यांनी जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीचे वतीने अँड कुळकर्णी अँड कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले. आनंदवाडी येथे राहणारे तेजस तुषार बांदेकर व तन्मय तुषार बांदेकर या दोन २० वर्षीय महाविद्यालयीन युवकांना पहाटे ६.१५ चे सुमारास देवगड-वानिवडे गाडी चालवणाऱ्या एस.टी.चालकाने रस्त्याच्या विरुध्द बाजूला जावून ठोकर दिली होती. सदर युवकांना ठोकल्यानंतर संबंधित एस.टी. रस्त्यानजीक असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये घुसली होता. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झालेला तेजस तुषार बांदेकर दि. ०८/०७/२०२३ रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने कोल्हापूर येथे मयत झाला होता. तर दुसरा दुचाकीस्वार तन्मय तुषार बांदेकर हा गंभीररित्या जखमी झाला होता. याकामी देवगड पोलीसांनी एस.टी चालक संजय रविंद्र पाटील याचेवर भा.दं.वि. कलम ३०४ २७९, ३३७, ३३८, मो.वा.कायदा ९८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान संशयित आरोपी न्यायालयात हजर केले असता देवगड न्यायालयाने संशयित एस.टी.चालकाला जामीन मंजूर केला आहे.

error: Content is protected !!