मळगावत पाच फणांच्या नागोबाचे दिड दिवस पूजन….!

गोसावी घराण्यात जपली जातेय 200 हून अधिक वर्षाची अनोखी परंपरा

कुडाळ (अमोल गोसावी) : दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे. मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दोनशेहूनही अधिक वर्षे ही दीड दिवसाची नागपंचमी साजरी होत आहे. विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो.

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना, निसर्ग-संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मातीच्या नाग प्रतिमेचे पूजन करून तिला लाह्याचा दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. इतर ठिकाणी सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास अळवाच्या पानावर विसर्जन केले जाते. मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस पाच फण्याच्या नागोबाची पूजा करण्यात येते. वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा शांताराम बंडू गोसावी व रामचंद्र बंडू गोसावी, यांच्यानंतर ही परंपरा त्यांची मुले धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी व त्यांचे कुटुंबीय जतन करीत आहेत.

नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन व एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते. नागोबाचे विधिवत पूजन करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. सायंकाळी अळवाच्या पानात नागाचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद दिला जातो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षक अशी सजविण्यात आली. त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात आले. दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी गोसावी घराण्यातील महिलांचा “ओवसा” तर सायंकाळी भजन फुगड्या आदी कार्यक्रम होणार आहेत. मळगाव तसेच पंचक्रोशीतील भाविक सकाळपासूनच उपस्थिती राहून नागोबाचे दर्शन घेत आहेत. मंगळवारी नागोबाचे पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात अळवाच्या पानात विसर्जन केले जाणार आहे.

error: Content is protected !!