कासार्डे नागसावंतवाडी मधील अवैध सिलिका उत्खनन वर कारवाई करा – अनंत पिळणकर
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील इको सेन्सिटिव्ह भागात अवैध सिलिका उत्खनन सुरू आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली आहे. या सिलिका माफियांवर शासन नियमानुसार कारवाई करावी.तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील अन्य भागांत अवैध सिलिका उत्खनन, अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्यास त्यावर कारवाई करावी. अवैध उत्खनन अथवा वाहतुक टाळण्यासाठी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देऊन भरारी पथक नेमावे. भरारी पथकाकडून यापूर्वी कोणतीही कारवाई झालेली नाही. तालुक्यात होत असलेले अवैध उत्खनन आणि अवैध खनिज वाहतूक ही महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. याला वेळीच आळा घाला अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा पिळणकर यांनी दिला आहे.












