ब्युरो न्युज (मुंबई) : इंडिया आघाडीच्या बैठकीआधी महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांची आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. “देशातील सर्व माता-बघिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधन केवळ एका दिवसासाठी असायला नको. प्रत्येक दिवस महिला सुरक्षेचा असला पाहिजे. असं शासन असलं पाहिजे. दुर्देवाने तसं शासन दिसत नाही. मी मधल्या काळात त्यावर भाष्य केलं होतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं होतं की, मुस्लिम महिलांकडून राखी बांधा. मी म्हटलं की, बिल्कीस बानोकडून सुरुवात करा, मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढली गेली, दिल्ली आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू महिलांना सुरक्षित वाटेल असं सरकार असायला हवं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही एकत्र आलो आहोत, कारण आम्हाला देशाची रक्षा करायची आहे. आम्ही तानाशाही, जुमलेबाजीच्या विरोधात आहोत”, असं ठाकरे म्हणाले.
“आमची तिसरी बैठक होत आहे आणि आता गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. आमची बैठक जसजशी पुढे जाईल तसं दर कमी होतील. आम्ही जसे पुढे जाऊ तसं कमी होतील. काही दिवसात तर गॅस मोफत दिलं जाईल कारण सरकार स्वत: गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे भाव कमी केले असतील तर मला काही आश्चर्य वाटत नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.











