खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे (गावठाणवाडी) या गावचे सुपुत्र श्री विवेकानंद उर्फ दिलीप विठ्ठल मण्यार यांना खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण यांच्या वतीने देण्यात येणारा सन -२०२३ चा आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
खारेपाटण शेतकरी सहकारी सोसायटीच्या वतीने दरवर्षी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावातील शेतकरी सभादाची आदर्श शेतकरी म्हणून निवड केली जाते.यावर्षी आदर्श व कृतिशील व उपक्रम शेतकरी म्हणून श्री दिलीप मण्यार यांची संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आदर्श शेतकरी श्री विवेकानंद उर्फ दिलीप मण्यार यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री सुरेंद्र कोरगावकर,संचालक श्री इस्माईल मुकादम,एकनाथ कोकाटे,श्रीधर गुरव,संतोष सरफरे,मंगेश गुरव, रघुनाथ राणे,अशोक पाटील,मोहन पगारे,रवींद्र शेट्ये,संदेश धुमाळे, सौ.उज्ज्वला चिके व संस्थेचे सचिव श्री कृष्णा कर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.













