कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील मानव बहु सामाजिक संस्था डोणगाव यांचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी डोणगाव येथे सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण केले जाणार असून रोख रक्कम स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील हा अत्यंत मानाचा पुरस्कार असून याआधी राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण काव्यगौरव पुरस्कारप्राप्त औरंगाबाद येथील कवी हबीब भंडारे यांच्या काव्यसंग्रहाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाने अल्पावधीतच मराठी साहित्य विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संयत विद्रोहाचा अविष्कार हे राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहातील कवितांचे वैशिष्ट्य आहे. राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला याआधी काव्य रसिक मंडळ डोंबिवली, ATM पुरस्कार पुणे, सारांश पुरस्कार मिरज, कदंब पुरस्कार कोल्हापूर अशा चार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाने आपली छाप पाडली असून याबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.