शाळा व्यवस्थापन समितीने दिल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. आज शाळेत विद्यार्थी शिक्षक बनले होते. या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शिक्षकांचे दैनंदिन कामकाज समजावून घेतले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंचवली गावचे सामाजिक कार्यकर्तेसूर्यकांत भालेकर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षा साक्षी भालेकर, नूतन उपाध्यक्षा प्रियांका खोत यांनी शाळेत जाऊन शाळेचे उपशिक्षक अमोल भंडारी सर,शाळेत कार्यरत खारेपाटण हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. योगिनी रानडे मॅडम तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता शाळेत आलेल्या या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका प्रभा अकिवाटे यांना गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समितीने दिलेल्या या शुभेच्छांमुळे शिक्षक भारावून गेले. यावेळी समितीने शाळेने राबविलेल्या शिक्षक दिन या उपक्रमाचे कौतुक केले.













