ब्युरो न्युज (ठाणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज ठाण्यात सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठाण्यातील सर्व दुकाने, मॉल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शहरात शुकशुकाट पसरला आहे. रस्त्यावरील वाहतूकही तुरळ सुरू आहे. अनेकांनी रिक्षा, टॅक्सी आज रस्त्यावर उतरवल्या नाहीत. त्यामुळे चाकरमान्यांचे स्टेशनला आणि नातेवाईकांकडे जाताना हाल होत आहे. ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाक्यानाक्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ठाण्यातील माजीवाडा जंक्शन या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटीलसह मराठा समन्वयकांनी खासगी वाहने, रिक्षा, परिवहन बसेस तसेच आस्थापनांना विनंती करत बंद करण्यास सांगितले. कृष्णा पाटील बसेस आणि रिक्षा बंद करत असल्याने राबोडी पोलिसांनी पाटील यांच्यासह मराठा समन्वयकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. वाहने बंद करण्यात येत असल्याने माजीवाडा जंक्शन आणि मुंबई ते नाशिकला जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
ठाणे बंदमुळे विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना स्टेशनला जायला रिक्षा मिळत नाहीये. गृहिणींनाही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी रिक्षा मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे शहरातील बसेस सुरू आहेत. मात्र, बस आणि एसटीला प्रचंड गर्दी होत असल्याने त्यातून प्रवास करणंही कठीण झालं आहे.












